अलीकडेच अभिनेत्री प्राजक्ता माळी महाकुंभमध्ये हजेरी लावण्यासाठी गेली होती. तिथे तिने भक्तिमय वातावरणात कुंभ स्नान केले. १४४ वर्षांनी होणाऱ्या या ऐतिहासिक महाकुंभात भाग घ्यावा, असा तिचा मनात ठरवलेला होता. प्राजक्ता माळीच्या आध्यात्मिक प्रेमामुळे ती नेहमीच चर्चेत असते. काहीच दिवसांपूर्वी तिने १२ ज्योतिर्लिंगांचे दर्शन घेतले होते, आणि आता महाकुंभातील अनुभव घेण्यासाठी ती तिथे आली होती. महाकुंभात तिने स्वामी गोविंद देवगिरी महाराज यांची भेट घेतली. त्यांच्या पायांवर नतमस्तक होऊन तिने एक महत्त्वाचा प्रश्न विचारला: “महाकुंभाबद्दल अनेक मतमतांतर आहेत, त्याबद्दल तुमचं काय मत आहे?”
स्वामी गोविंद देवगिरी महाराज उत्तर देताना म्हणाले, “सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या शास्त्रात मुहूर्ताचं आणि स्थळाचं महत्त्व असतं. विशिष्ट स्थळी केल्या गेलेल्या कर्मांचा प्रभाव कित्येक पट वाढतो. उदाहरणार्थ, एक मण्याचा जप तुम्ही घरात केला, तर त्याचा एकच फळ मिळतो, पण तोच जप जर गायीच्या गोठ्यात बसून केला तर त्याचे १० मण्यांचं फळ मिळते. गंगेच्या तीरावर तोच जप केला, तर १००० मण्यांचं फळ मिळते. आणि जर तो जप आपल्या गुरूंच्या जवळ बसून केला, तर अनंत फळ मिळतात. मण्यांची संख्या आणि वेळ सारखं असतात, पण स्थान आणि संदर्भामुळे त्याचा परिणाम बदलतो. तसंच मुहूर्तांचं आहे. कुंभाच्या वेळेतील मुहूर्तांमध्ये एक विशिष्ट प्रभाव जलामध्ये निर्माण होतो.”
स्वामी महाराज पुढे सांगतात, “पौराणिक कथेप्रमाणे, जेथे अमृताचे बिंदू पडले, त्या त्या ठिकाणी अमृताचा प्रभाव पाहायला मिळतो. शास्त्रीय गोष्टी आम्ही कथा रूपात सांगतो, ज्यामुळे लोकांना ती श्रद्धेने स्वीकारता येते. उदाहरणार्थ, कोजागिरीच्या रात्री चंद्राखाली दूध ठेवून देवाच्या नैवेद्य म्हणून ते दूध प्राशन करणे, याचं एक विशिष्ट महत्त्व आहे. हे महत्त्व कोजागिरीच्या रात्रीच असते, त्याप्रमाणे महाकुंभाचंही महत्त्व आहे. गंगा, यमुना, आणि सरस्वती या तिन्ही नद्या एकत्र येतात, आणि प्रयाग हा तिर्थराग मानला जातो, म्हणून या पवित्र मुहूर्तावर येथे स्नान करण्याला अत्यंत महत्त्व आहे.”